Home दैनंदिन बातम्या उदयनगरच्या जि.प.शाळेची परसबाग ठरली राज्यात सरस, रविवारी सत्कार

उदयनगरच्या जि.प.शाळेची परसबाग ठरली राज्यात सरस, रविवारी सत्कार

पोषण आहारात वापरतात बागेतील भाजीपाला

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक, परिचारिकांच्या विशेष कार्याची अलिकडेच देशपातळीवर दखल घेतल्यानंतर आता जि.प.शाळेनेही राज्यस्तरावर बाजी मारली. मुलचेरा तालुक्यातल्या उदयनगर येथील जिल्हा परिषदेच्या बांग्ला शाळेतील परसबाग राज्यात सर्वोत्कृष्ट ठरली आहे. शाळेच्या आवारात निर्माण केलेल्या या परसबागेतील भाजीपाला, फळांचा वापर विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात केला जातो. त्यामुळे ही परसबाग आदर्श ठरली आहे. येत्या रविवारी पुण्यात आयोजित कार्यक्रमात या शाळेला सन्मानित केले जाणार आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता परसबाग स्पर्धा घेण्यात आली. यात गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील उदयनगर बांग्ला जि.प.प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश 15 ऑक्टोबर 2019 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले होते. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे, असे विविध हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत.

या स्पर्धेकरिता सुरूवातीला तालुकास्तरावरील परसबागांचे मूल्यांकन करून प्रत्येक जिल्ह्यांतून एक परसबाग राज्यस्तरीय मूल्यांकनास पात्र ठरलेली होती. अशा सर्व जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या परसबागांचे परिक्षण झाल्यानंतर निर्धारित निकषांच्या आधारे राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय-दोन, तृतीय आणि प्रोत्साहनपर तीन अशा शाळांची निवड करण्यात आली. यात प्रथम क्रमांक उदयनगरच्या शाळेला घोषित करण्यात आला. पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचा विशेष सन्मान रविवार 29 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी-सीईओंकडून अभिनंदन

जिल्ह्याच्या सन्मानात भर घालणाऱ्या उदयनगर जि.प.शाळेचे शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व सर्व संबंधितांचे जिल्हाधिकारी संजय दैने आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी इतर सर्वच शाळांनी आपल्या शाळांमध्ये परसबागा निर्माण करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याचे आवाहन सीईओ आयुषी सिंह यांनी केले आहे.