निवडणूक जिंकली, आता मतदारांची मनं आणि विश्वास जिंकण्याचे आव्हान

आमदारकी डोक्यात शिरणार नाही ना?

वृत्तवेध / मनोज ताजने

गडचिरोली : गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघांमध्ये विधानसभेचा रणसंग्राम जिंकणारे उमेदवार डॅा.मिलिंद नरोटे आणि रामदास मसराम हे पहिल्यांदाच राजकारणाच्या आखाड्यात उतरले आणि जिंकले. दोघेही वेगवेगळ्या पक्षांचं प्रतिनिधीत्व करतात. माणूस म्हणून दोघेही चांगले आहेत. दोघांचीही पाटी कोरी आहे. त्यामुळे एक संधी त्यांना देऊन पाहू, असा विचार करून मतदारांनी दोघांनाही कौल दिला. अर्थात हा विजय केवळ त्या उमेदवारांचा वैयक्तिक नाही, तर त्यांच्या मागे असलेल्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि संपूर्ण यंत्रणेचा आहे यात दुमत नाही. पण इथून पुढे पाच वर्ष हे दोन्ही आमदार आपल्या कोऱ्या पाटीवर काय-काय लिहितात यावरच त्यांचे पुढील राजकीय भवितव्य ठरणार आहे.

पक्षाचे तिकीट मिळण्यापासून निवडून येईपर्यंतच्या अल्पशा कालावधीसाठी या उमेदवारांच्या पाठीशी त्यांची संपूर्ण यंत्रणा होती. त्यामुळे नवखेपणाची जाणीव होऊ न देता त्यांना विजयाच्या रथावर आरूढ होण्यासाठी अनेकांनी हातभार लावला. पण आता पुढील पाच वर्षाच्या प्रवासात त्यांना आमदार म्हणून आपली प्रतिमा स्वत:च बनवावी लागणार आहे. आमदारकी डोक्यात शिरू न देता सर्वसामान्यांशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. आपल्या वागण्या-बोलण्यापासून तर संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कसा प्रतिसाद देतात, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता कशी करतात यावर या नवनिर्वाचित आमदारांची प्रतिमा तयार होणार आहे.

‘अजून आमदार म्हणून शपथ घ्यायचे आहे, पण त्यांना आमचा फोन घ्यायला वेळ नसतो… यांच्याकडून कॅालबॅक करण्याची अपेक्षा काय ठेवणार..?’ असा तक्रारीचा सूर आतापासून लोकांमध्ये उमटत आहे. वास्तविक प्रत्येक फोन कॅाल स्वीकारण्यासाठी आमदार रिकामटेकडे नसतात. पण फोन करणारी व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीला काही महत्वाचे सांगायचे, विचारायचे आहे का, याचे भान ठेवून वागणे कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी गरजेचे असते. नवीन असले तरी तेवढी समज त्यांना असावी, अशी माफक अपेक्षा ठेवणे गैर नाही. किमान महत्वाच्या कामात किंवा एखाद्या कार्यक्रमात असल्याने फोन रिसिव्ह करू न शकल्यास आलेल्या नंबरवर नंतर कॅालबॅक करणे अपेक्षित असते. त्यामुळे आमदाराची किंमत कमी होत नाही. उलट समोरच्या व्यक्तीच्या मनात गैरसमज निर्माण न होता आपुलकी वाढते. जिल्ह्यातील अनेक यशस्वी राजकीय नेत्यांना हे टेक्निक माहित आहे. त्यांच्या डोक्यात आमदारकी, खासदारकीच नाही तर मंत्रीपदाची हवाही कधी शिरली नाही. हेच त्यांच्या अनेक वर्षातील यशाचे गमक ठरले आहे.

नवीन लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासनं पूर्ण करणं कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी सहज शक्य नसते. त्यासाठी कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरीही यश येईलच, आणि मतदारांचे पूर्ण समाधान होईलच याची शाश्वती नसते. पण सामान्य मतदारांच्या मनात घर करण्यात यश आले तर पुढचा प्रवास सुकर झाल्याशिवाय राहात नाही. त्यासाठी आमदारकीची हवा डोक्यात शिरू न देता लोकांची मनं आणि विश्वास जिंकण्याचं तंत्र नवीन लोकप्रतिनिधींना आत्मसात करावं लागणार आहे. त्यात ते यशस्वी होतील का, हे पुढील काळात दिसून येईल.