भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा ओबीसी नेत्याला मिळणार संधी?

पक्ष निरीक्षकांनी जाणले गुप्त मत

गडचिरोली : भाजपच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षाच्या निवड प्रक्रियेसाठी पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत एक बैठक रविवारी येथील विश्राम भवनात पार पडली. यावेळी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाध्यक्षपदी कोणाला घ्यावे याबद्दलचे गुप्त मत जाणून घेण्यात आले. त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविल्यानंतर त्यांच्याकडून जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार आहे.

विशेष म्हणजे विद्यमान अध्यक्ष प्रशांत वाघरे यांचा कार्यकाळ संपायचा असल्याने पुन्हा त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय इतर काही ओबीसी चेहऱ्यांची नावे समोर येतात, की संघाच्या शिफारसीनुसार कोणते नाव समोर केले जाते, याकडेही ईच्छुकांचे लक्ष लागले आहे.

पक्ष निरीक्षक म्हणून आलेले माजी आमदार हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम भवनात यासंदर्भात बैठक झाली. पक्षाच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांच्यासह आ.डॅा.मिलिंद नरोटे, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, मा.आ.डॉ.देवराव होळी, मा.आ.कृष्णा गजबे, मा.आ.डॉ.नामदेव उसेंडी आदी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.

पक्ष निरीक्षक माजी आमदार हेमंत पटले यांनी सविस्तर मार्गदर्शन करताना, संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची निवड ही काळाची गरज आहे. सर्वांचे मत घेऊन प्रक्रियेची पारदर्शकता जपली जाईल, असे यावेळी सांगितले.

या बैठकीत मार्गदर्शन करताना मा.खा.डॉ.अशोक नेते म्हणाले, भाजप हा आज जगातील सर्वात मोठा आणि यशस्वी पक्ष आहे. आपली संघटनात्मक ताकद टिकवण्यासाठी जिल्हाध्यक्ष हा सर्वसमावेशक, मनमिळावू, न्यायप्रिय आणि पक्षाशी निष्ठावान असावा. निवड प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कार्यकर्त्यांचा विश्वास यावर पक्षाची ताकद उभी आहे. चाचपणी व शिफारशीनंतर नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जातील व त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे ते म्हणाले.

या बैठकीला प्रामुख्याने ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, योगिता पिपरे, सदानंद कुथे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, आदिवासी मोर्चाचे जिल्हा प्रभारी डॅा.नितीन कोडवते, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.उमेश वालदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, देसाईगंजच्या माजी नगराध्यक्ष शालू दडवंते, तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.