गडचिरोली : महिलांवरील अत्याचाराला पुरुषप्रधान व्यवस्था व मानसिकता जबाबदार असली तरी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. यामुळेच समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाते. कोणी आपल्यावर अत्याचार करत असेल तर लगेच मुलींनी, महिलांनी त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. राज्यातील थोर समाजसुधारकांनी सामाजिक विषमता व अन्यायकारक समाज व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला. म्हणूनच आज आपण आत्मविश्वासाने स्वावलंबी होण्याचे स्वप्न पाहू शकतो. मुलींनी पारंपरिक चौकटीला छेद देऊन मोठे ध्येय गाठावे, असे आवाहन अहेरी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे यांनी केले.
अहेरी तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा खमनचेरू येथे आयोजित प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका बी.डी.दुगा, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक प्रदीप लोहकरे, डी.डी.भोंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक जी.आर. बोकडे यांनी केले. एस.एम.कोंकमुट्टीवार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी शिक्षक पी.एम. बोरसे , व्ही.एन.बडगेलवार, विनायक सिडाम, एस.आर.वाहाणे, राहुल रामटेके, लिना खोब्रागडे, अमृता चांदेकर, आर.पी. दुर्गे, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.