गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विविध उपाययोजना करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाच्या 21 ऑगस्ट व 27 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व इतर पर्यवेक्षकीय अधिकारी अशा तब्बल 50 अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती करून विविध खाजगी व शासकीय शाळांना अचानक भेटी दिल्या. त्यात विद्यार्थी व विद्यार्थींनीच्या सुरक्षेबाबत शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या किंवा नाही याबाबत तपासणी केली.
या तपासणीमध्ये शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी शाळांनी केलेले नियोजन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी, शाळेत ठेवण्यात आलेली तक्रार पेटी दर आठवडयात उघडण्यासंबंधाने केलेली कार्यवाही व नोंदी, शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय 4 ऑक्टोबर 2016 नुसार राष्ट्रीय बालअधिकार आयोगाचे संकेतस्थळ व पोक्सो ई-बॉक्सबाबतची माहिती शाळांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे, सखी सावित्री समिती स्थापन करणे आणि समितीच्या घेतलेल्या बैठका यासंबंधाने सविस्तर पाहणी करण्यात आली. सदर तपासणी अहवालानुसार निदर्शनास आलेल्या त्रुटींचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून पुनश्च सविस्तर आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यांतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या, जिल्हा परिषदेच्या शाळांचे मुख्याध्यापक व इतर पर्यवेक्षकीय यंत्रणा यांनी शासन निर्णयातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून येणार नाही याची दक्षता घेण्याचे सक्त निर्देश सीईओ आयुषी सिंह यांनी दिले आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाही याबाबत सर्वांनी दक्ष राहावे, तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही, विद्यार्थी सुरक्षेबाबत वेळोवेळी शाळांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. भविष्यात विद्यार्थी सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेस प्राधान्य देऊन शाळा व्यवस्थापनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व पालक यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबत करावयाच्या उपाययोजनेमध्ये शाळा व्यवस्थापनास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.