गडचिरोली : राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकिय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ राबविले जात आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली नगर परिषद कार्यालयामार्फत शुक्रवारी आठवडी बाजार परिसरात महिलांचे शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या जिल्हा महामंत्री योगिता पिपरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, तर अतिथी म्हणून प्रा.डॅा.सविता गोविंदवार (सादमवार), सामाजिक कार्यकर्त्या निशा गेडाम, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, मुक्तेश्वर काटवे, संजय मेश्राम, केशव निंबोळ व सामाजिक कार्यकर्त्या करकाटे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात विविध योजनांचे १८ स्टॉल लावले होते. कार्यक्रमाला १२८२ महिला उपस्थित होत्या. सदर महिलांना विविध योजनेअंतर्गत ६७०० लाभांचे वितरण करण्यात आल्याचे नगर परिषदेच्या वतीने कळविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वंदना गेडाम व शिक्षिका संध्या चिलमवार यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नगर परिषद शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. आभार प्रदर्शन गणेश नाईक यांनी केले.
विविध स्पर्धा आणि त्यातील विजेते असे आहेत
सदर कार्यक्रमाच्या वेळी आयोजित रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषीक ३००० रुपये व शिल्ड प्रणोती नंदकिशोर मुसळे, द्वितीय २००० व शिल्ड वर्षा पवन डोंगरवार यांना मिळाले. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषीक ३००० रुपये व शिल्ड राजीव गांधी नगर परिषद प्राथमिक शाळेला, तर द्वितीय परितोषिक २००० रुपये व शिल्ड सोनवाने गृप नगर परिषद गडचिरोली यांना प्रदान करण्यात आले. तसेच संगित खुर्ची स्पर्धेत रुपाली नैताम यांना ३००० रुपये व शिल्ड प्रदान करण्यात आले.