गडचिरोली : गडचिरोलीकरांसाठी आजची संध्याकाळ ऐतिहासिक ठरणार आहे. लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेडच्या वतीने आयोजित गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग (जीडीपीएल) क्रिकेटचा रोमांचक असा अंतिम सामना बुधवारी संध्याकाळी होणार आहे. यासोबतच शानदार असा बक्षीस वितरण समारंभ आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या संगीत मैफलीचे साक्षीदार होण्याचा बहुमान गडचिरोलीकरांना मिळणार आहे. शहरातील एमआयडीसी ग्राऊंडवर होणाऱ्या या सोहळ्याचा आनंद जास्तीत जास्त लोकांना घेता यावा यासाठी सर्वांना आपले आधार कार्ड दाखवून नि:शुल्क प्रवेश दिला जाणार आहे. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

संध्याकाळी 4 ते 7.30 वाजेपर्यंत चालणारा हा अंतिम सामना गडचिरोली हरिकेन्स आणि गडचिरोली वॅारियर्स पोलीस संघ यांच्यात होणार आहे. त्यानंतर 8 वाजेपर्यंत बक्षीस वितरण समारंभ आणि 8 वाजता गायक सोनू निगम यांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. अनेक चित्रपटातील लोकप्रिय गित गाणाऱ्या सोनू निगम यांना प्रत्यक्ष गाताना पाहण्याची संधी या निमित्ताने गडचिरोलीकरांना मिळणार आहे.
गडचिरोलीकरांसाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या या सोहळ्याला जवळपास 20 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता पाहून तशी व्यवस्था आयोजकांनी केली आहे. याशिवाय या ग्रँड फिनाले आणि संगीतमय कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यात गडचिरोलीचे सहपालकमंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
‘हा कार्यक्रम गडचिरोलीच्या चैतन्यशील आत्म्याचा आणि एकतेचा पुरावा आहे. आम्ही क्रीडा, मनोरंजनासह सर्व समुदायाला एकत्र आणण्यासाठी खूप उत्सुक आहोत, जो समारंभ पुढील अनेक वर्षे लक्षात राहील. सोनू निगम कॉन्सर्टसह हा भव्य समारंभ यशस्वी होत असल्याचा आनंद आणि अभिमान आहे,’ अशी भावना लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरण यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे ज्यांना या समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही त्यांच्यासाठी हा कार्यक्रम यु-ट्युबवर लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे.