Home दैनंदिन बातम्या मुख्य सचिवांचा सिरोंचा दौरा, शैक्षणिक संस्था व पायाभूत सुविधांची पाहणी

मुख्य सचिवांचा सिरोंचा दौरा, शैक्षणिक संस्था व पायाभूत सुविधांची पाहणी

'वडदम जीवाश्म उद्यानाचा विकास करा'

गडचिरोली : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी रविवारी सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शैक्षणिक संस्थांना भेटी देत विविध विकास कामे आणि तालुक्यातील पायाभूत सुविधांची पाहणी केली. वडदम येथील जीवाश्म उद्यानाचा भूवैज्ञानिक वारसा जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य सचिवांनी वडदम येथील जीवाश्म उद्यानाला (फॉसिल पार्क) भेट देऊन परिसराची पाहणी केली. उद्यानातील जीवाश्मांचे संवर्धन आणि पर्यटन विकासाबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक निर्देश दिले. यावेळी कोलकाता येथील संग्रहालयात ठेवण्यात आलेले डायनासोरचे जीवाश्म मूळ ठिकाणी परत आणण्याबाबतही चर्चा झाली. मुख्य सचिवांच्या हस्ते उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

दौऱ्यादरम्यान त्यांनी कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय आणि आदिवासी मुलींच्या आश्रमशाळेला भेट दिली. तसेच तुमनूर येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी शिक्षण आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.

मुख्य सचिवांनी आशा स्वयंसेविकांशी चर्चा करून त्यांच्या आरोग्यविषयक कामकाजाची आणि अडचणींची माहिती घेतली. तसेच तुमनूर येथील ग्रामपंचायत परिसर आणि फळबागांना भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून ग्रामीण विकासाबाबत त्यांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या दौऱ्यात मुख्य सचिवांनी मेडिगड्डा प्रकल्प आणि नगरम येथील पुलाचीही पाहणी केली.