Home दैनंदिन बातम्या अवैध रेती उपसाप्रकरणी देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डुडूलकर अडचणीत

अवैध रेती उपसाप्रकरणी देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डुडूलकर अडचणीत

विभागीय आयुक्त कार्यालयाचे दोषारोपपत्र

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाला येथील सिंड्राई रेतीघाटातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि जप्त ट्रकवर कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचे प्रकरण तहसीलदार प्रीती डुडूलकर यांच्या अंगलट आले आहे. कर्तव्यात दिरंगाई केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्या प्रस्तावावर शासनाने म.ना.से. (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 8 अन्वये ज्ञापन व दोषारोप निर्गमित केले आहेत.

जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी दि.30 जुलै 2026 रोजी विभागीय आयुक्त नागपूर यांना प्रपत्र १ ते ४ सह प्रस्ताव सादर केला होता. त्यात मौजा कोंढाळा येथील सिंड्राई घाट येथे वारंवार अवैध रेती व मुरूम उपसा झाला. या प्रकरणात जप्त ट्रक कोणतीही रितसर कारवाई न करता सोडून देण्यात आले. या सर्व घडामोडी देसाईगंजच्या कार्यक्षेत्रात घडल्या असून यात म.ना.से. (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3(1) चा भंग झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

त्यावर महसूल व वन विभागाने ज्ञापन क्र.विभाचौ-2026/प्र.क्र.87/आस्था-4अ, दि.6.10.2026 अन्वये कारवाई केली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूरने दि.9.10.2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सदर ज्ञापन तहसीलदारांवर बजावण्याचे निर्देश दिले.

कोंढाळा मृत्यू प्रकरणाशी संबंध काय?

या कारवाईला कोंढाळा येथील अपघाताची किनार आहे. सिंड्राई घाटावरील अवैध उत्खननादरम्यान विलास देवढगले यांचा मृत्यू झाला होता. त्याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार रामदास मसराम (आरमोरी) यांनी दि.20.07.2026 रोजी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यावर आयुक्त कार्यालयाने दि.12.08.2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. जिल्हाधिकाऱ्यांनी दि.07.09.2026 रोजी अहवाल सादर केल्यानंतर हे प्रकरण दि.18.09.2026 रोजी नस्तीबद्ध करण्यात आले.

आता नियम 8 अंतर्गत दोषारोप बजावल्याने तहसीलदारांना खुलासा द्यावा लागणार असून, पुढे चौकशी अधिकारी नेमून सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. दोष सिद्ध झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.