सिरोंचा : तालुक्यातील कोटापल्ली येथे मदनाम पोचम्मा देवी मंदिर परिसरात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित दोन दिवसीय बोनालू उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. दि. 30 व 31 मार्च रोजी झालेल्या या उत्सवात महिलांनी सायंकाळी कलश धारण करून गावातून फेरी काढली. पारंपरिक वाद्याच्या तालावर अनेकांनी ठेका धरून नृत्यही सादर केले.

या उत्सवात महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातील भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोटापल्ली येथील या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. 31 मार्च हा यात्रेला हजारो भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता.
उत्सवादरम्यान विविध प्रकारची दुकाने लागली होती. भक्तगण मदनाम पोचमा देवीचे दर्शन घेऊन पूजाअर्चा करत आपली मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी देवीला साकडे घालत होते. अनेकांनी नवस बोलून पुढील यात्रेत तो फेडण्याची कामना केली.
यात्रेच्या पाहिला दिवशी देवी प्राणहिता नदीवर स्नान करून सायंकाळी 7 वाजतादरम्यान मंदिर परिसरात आल्यानंतर रात्री 9 वाजेपासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत देवीच्या महात्म्यावर आधारित विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मदनाम पोचम्मा देवीचा हा उत्सव तालुक्यातील सर्वांत मोठी जत्रा मानली जाते. त्यामुळे ही जत्रा सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असते.
बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खिर शिजविली जाते. शिजलेली खिर सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा करून देवीला प्रसाद अर्पण करतात. त्यानंतर भाविकांनाही तो प्रसाद वाटण्यात येतो.
यात्रेसाठी आलेल्या भाविकांसाी मंदिर कमिटीतर्फे दोन दिवस निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय अन्य सोयीसुविधाही उपलब्ध करण्यात आल्या होत्या.