चामोर्शीत धानाच्या बोनसचा घोटाळा? एसडीओंच्या नेतृत्वात समिती गठीत

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तपासणीचे आदेश

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील धान खरेदी घोटाळ्यानंतर आता चामोर्शी तालुक्यात धानाच्या बोनसमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली. याप्रकरणी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमली आहे.

यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने हेक्‍टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केला होता. मात्र या प्रक्रियेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून भूमिहीन व्यक्तींच्या खात्यावर प्रत्येकी 40 हजार रुपये जमा करून ते पैसे परस्पर काही खात्यांवर वळते केले. या माध्यमातून एकट्या चामोर्शी तालुक्यात जवळपास 200 कोटींचा बोनस घोटाळा झाल्याची तक्रार चामोर्शीचे नगरसेवक आशीष पिपरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि यात सहभागी इतर यंत्रणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पिपरे यांच्या तक्रारीनुसार, भूमिहीन व्यक्तींच्या नावे शेती दाखवून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी 40 हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर संबंधित व्यक्तींना दोन ते तीन हजार देऊन उर्वरित रक्कम इतरत्र वळती करण्यात आली. अशा बोगस लाभार्थ्यांची यादी तक्रारीत देण्यात आली आहे. या प्रकरणाची विशेष समितीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पिपरे यांनी केली होती. त्याची आधी दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी 15 एप्रिल रोजी काही पिडीत शेतजकऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारीही उपस्थित होते. या चर्चेदरम्यान सदर घोटाळ्यात चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाचाही सहभाग असण्याची शक्यता समोर आली. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी पंडा यांनी दिले.