गडचिरोली : पदवीधर मतदारसंघाचा आमदार या नात्याने माझा आमदार निधी हा शैक्षणिक उद्देशासाठीच खर्च व्हावा, असा संकल्प विजयी झाल्यानंतर मी केला होता. त्या संकल्पपूर्तीसाठी दरवर्षी माझ्या मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात आमदार निधीच्या माध्यमातून ग्रंथालयांना आवश्यक असलेली पुस्तके आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि संगणकीय ज्ञानात भर पडावी या उद्देशाने संगणक वाटप करीत आहे. माझा निधी ज्ञानवृद्धीसाठी खर्च होत आहे याचे समाधान आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील मुख्य प्रतोद तथा आमदार अभिजित वंजारी यांनी केले.

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात गुरुवारी आयोजित ‘कर्तव्यपूर्ती सोहळ्या’त ते बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ.हेमंत सोनारे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्या भागातील शाळांना संगणकीय शिक्षणाच्या दृष्टीने बळकट करण्यासाठी संगणकांचे वाटप करत आहे. शिवाय ग्रंथालयात गेल्या कित्येक वर्षांपासून तीच ती जुनी पुस्तके आहेत. आजच्या काळाची गरज ओळखून जागतिक घडामोडी, तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, युवांसाठी करिअरच्या नव्या संधी आणि वाटा या विषयांवरची, अर्थात आधुनिकतेची गरज ओळखून आवश्यक असलेली पुस्तके जिल्ह्यातील ग्रंथालयांना उपलब्ध करून दिली जात आहे. या संगणक आणि पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांनी करावा, ही आता शिक्षक आणि ग्रंथालयांची जबाबदारी आहे, असे आ.वंजारी म्हणाले.
आ.सुधाकर अडबाले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आ.वंजारी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळांकडून उपस्थित प्रतिनिधींना संगणकांचे, तर ग्रंथालयांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.हेमंत सोनारे यांनी केले.