ड्रोनने व्हिडीओ शुटींग करताय? पोलीस अधीक्षकांची परवानगी घ्या

अन्यथा होणार दंडात्मक कारवाई

गडचिरोली : अलिकडे ड्रोन कॅमेऱ्याने कोणत्याही लग्न, स्वागत समारंभ किंवा अन्य मोठ्या कार्यक्रमांचे व्हिडीओ शुटींग करण्याची प्रथा वाढली आहे. पण भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या परिस्थितीमुळे सध्या कोणतेही ड्रोन हवेत उडविण्यासाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. येत्या 3 जूनपर्यंत कोणतेही ड्रोन उडविण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

भारत –पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमध्ये दहशतवादी, राष्ट्रविरोधी घटक हे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एयरक्राफ्ट, पॅराग्लायर व इतर मानवरहित हवाई यंत्राचा वापर करून हल्ले करू शकतात. त्याद्वारे अतिमहत्वाच्या व जिल्ह्यातील मर्मस्थळांना लक्ष्य करु शकतात. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात. या कारणास्तव ड्रोन रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एयरक्राफ्ट, पॅराग्लायडर व इतर मानवरहित हवाई यंत्राद्वारे संभाव्य घातपात रोखण्यासाठी यावर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्रात पुढील 15 दिवसांसाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी नीलोत्पल यांनी सदर आदेश निर्गमित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 नुसार हा प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात 20 मे ते 3 जून 2025 या काळासाठी लागू राहणार आहे. मात्र यास हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या विशिष्ट लेखी परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील.

कोणत्याही व्यक्तीने सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. संबंधितांनी नमूद आदेशाचे उल्लंघन करु नये, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.