गडचिरोली : प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीतून प्रबळ दावेदार असणाऱ्या डॅा.नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी दिड हजार युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) पुस्तके वाटण्यात आली. यानिमित्त डॅा.किरसान यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी पाहता काँग्रेसजणांनी त्यांच्या उमेदवारीवर आताच शिक्कामोर्तब केले की काय, असे चित्र निर्माण झाले होते.
या कार्यक्रमासाठी माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, आ.अभिजित वंजारी, आ.सुधाकर अडबाले, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.आनंदराव गेडाम, माजी आ.पेंटाराम तलांडी, डॅा.नितीन कोडवते, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माजी मंत्री पुरके म्हणाले, या आदिवासी जिल्ह्यांमधून आयएएस, आयपीएस झाले पाहिजे. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास ठेवून तयारी करा, यश नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी युवकांना दिला. यावेळी आ.वंजारी आणि आ.अडबाले यांनीही मार्गदर्शन केले.
सुरूवातीला डॅा.किरसान यांनी प्रास्ताविक करताना या आदिवासीबहुल भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळावी आणि त्यासाठी त्यांना तयारी करण्यासाठी अद्यावत सामान्य ज्ञानाची माहिती असलेले पुस्तक फायदेशिर ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी डॅा.किरसान यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या सत्कार व अभिष्टचिंतन करण्यासाठी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमाचे संचालन सुनील चडगुलवार यांनी तर आभार प्रदर्शन सतीश विधाते यांनी केले.
या कार्यक्रमाला सतीश वारजुरकर, प्रकाश ईटनकर, डॅा.चंदा कोडवते, वामनराव सावसाकडे, दामदेव मंडलवार, प्रभाकर वासेकर, राजू कात्रटवार, मनोहर पोरेटी, रमेश चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.