गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रा.रमेश बारसागडे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. पण यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. दरम्यान माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी चामोर्शीत जाऊन प्रा.रमेश बारसागडे यांना शुभेच्छा देऊन त्यांचे संघटन कौशल्य व सामाजिक कार्याचा अनुभव भाजपला जिल्ह्यात नवे बळ देईल, अशी आशा व्यक्त केली.

याप्रसंगी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री सलीम शेख, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, जेष्ठ नेत्या पुष्पा करकाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वर्षात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रा.बारसागडे यांना ही महत्वाची जबाबदारी दिली. त्यामुळे भाजपसाठी यश खेचून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. अंतर्गत गटबाजी करणाऱ्यांना शांत करत हे यश मिळवण्याची कसरत ते कशा पद्धतीने करतात याकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे.