गडचिरोली : गेल्या चार वर्षांपासून काम सुरू असलेल्या पण अजूनही अपूर्णावस्थेत असलेल्या येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामांची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पाहणी केली. यावेळी हे काम गुणवत्तापूर्ण व्हावे अशी अपेक्षा करून येत्या 15 दिवसात सर्व अर्धवट कामे पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले. (सविस्तर बातमी खाली वाचा)

यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय इमारत, व्यायामशाळा, इनडोअर बॅडमिंटन हॉल, स्विमिंग टँक आणि डोम टाईप मल्टीगेम इनडोअर हॉल यासारख्या अंतिम टप्प्यात असलेल्या कामांची माहिती घेतली. त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संकुल समितीने कामाची गुणवत्ता तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी इनडोअर बॅडमिंटन हॉलमधील व्हेंटीलेशन तसेच खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. पंडा यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेली कामे 15 दिवसात पूर्ण करण्यास सांगितले.