सिरोंचा : गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने सिरोंचा येथे विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद हायस्कूल परिसरात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
एशियन व्हॅस्कुलर हॅास्पिटल प्रा.लि. यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या, पाय सुजणे, नस फुगणे अशा लक्षणांची मोफत तपासणी करून सल्ला देण्यात आला. (अधिक बातमी खाली वाचा)

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मा.खा.डॉ.अशोक नेते म्हणाले, “गोरगरिबांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी हा माझा ध्यास आहे. या उद्देशानेच आम्ही अशा मोफत शिबिरांचे आयोजन करत आहोत. ही केवळ तपासणी नव्हे, तर आरोग्याविषयी जनजागृतीचे अभियान आहे. रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार अनेकांना असतात, पण निदान न झाल्याने गंभीर स्थिती उद्भवते. त्यामुळे अशा शिबिरांची गरज ग्रामीण भागात अधिक आहे. या उपक्रमाची संकल्पना लोकांच्या गरजांच्या आधारावर मांडली होती आणि आज ती प्रत्यक्षात उतरताना पाहून समाधान वाटते, असे डॅा.नेते म्हणाले.
आरोग्याची पहिली पायरी म्हणजे वेळेवर तपासणी आणि योग्य मार्गदर्शन. आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याचे ते म्हणाले. यावेळी मा.खा.डॉ. नेते यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करवून घेतली. शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवून तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रामुख्याने ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचर्लावार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला, तालुकाध्यक्ष श्रीनाथ राऊत, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, माजी उपसभापती रहिम शेख शारीक शेख, लियाकत शेख तसेच आरोग्य सेवा कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.