एटापल्ली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी एटापल्ली तालुक्याला भेट देवून प्रशासकीय यंत्रणेसोबत तेथील कामांचा सविस्तर आढावा घेतला. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, कृषी आणि पावसाळी तयारीसंदर्भात माहिती जाणून घेत त्यांनी आपसी समन्वयाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
उपविभागीय कार्यालय एटापल्ली येथील सभागृहात आयोजित बैठकीला उपविभागीय अधिकारी नमन गोयल, तहसीलदार हेमंत गांगुर्डे व इतर तालुकास्तरीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (अधिक बातमी खाली वाचा)

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित दावे तातडीने निकाली काढण्याचे व वनहक्क पट्टाधारकांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे निर्देश दिले. तसेच कृषी विभागाने गरजू व पात्र शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून बोअरवेल योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यास सांगितले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला ग्रामस्तरावर ब्लिचिंग पावडरचा पुरवठा उपलब्ध करून घेण्याचे तसेच संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. मोबाईल नेटवर्क, धोकादायक पूल, विद्युत पुरवठा, जलयुक्त शिवार योजनेतील प्रलंबित कामे, पंतप्रधान किसान योजना आणि ॲग्रीस्टॅक योजनेच्या प्रगतीचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
पावसाळ्यात उघड्यावरील धान खराब होवू नये म्हणून तहसीलदारांनी किमान दोन गोदामे बांधकामासाठी जागा प्रस्तावित करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी एटापल्ली येथील एकलव्य मॉडल निवासी विद्यालयाच्या बांधकामाची देखील पाहणी केली. तसेच धरती-आबा योजनेंतर्गत एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत 15 ते 30 जूनपर्यंत विशेष संतृप्त शिबराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील एटापल्लीच्या शिबीरात जिल्हाधिकारी पंडा यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना विविध लाभ व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.