गडचिरोली : गडचिरोलीसह राज्यातील महत्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत. भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.19) घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी घेतला. यावेळी भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नवेगाव (मोर) – सुरजागड मिनरल कॅरिडोर यासह राज्यातील इतर रस्ते प्रकल्पांचे भूसंपादन, तसेच वडसा – गडचिरोली रेल्वेमार्गासह इतर रेल्वेचे प्रकल्प आणि गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांच्या विमानतळाच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. (अधिक बातमी खाली वाचा)
प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांनी मिशन मोडवर काम करावे. भूसंपादनाची कामे गांभिर्याने घेऊन तातडीने मार्गी लावावीत. याबाबत सर्वांनी गुणात्मक आणि रचनात्मक काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
विदर्भातील भंडारा – गडचिरोली, नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदिया या सर्व द्रुतगती मार्गांचा आराखडा गतीशक्तीवर रन करून अंतिम करुन घ्यावा. वडसा-गडचिरोली व वर्धा–नांदेड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण करून काम मार्गी लावण्यात यावे, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.
गडचिरोली विमानतळाचा ओएलएस करून घ्यावा आणि त्याचा प्रस्ताव गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी पाठवावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली. राज्यातील महात्वाकांक्षी 11 प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या 53 हजार 354 कोटी रुपयांच्या निधीची तरतुदही करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील या प्रकल्पांना गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग आणि वडसा – गडचिरोली रेल्वे मार्ग यांसारख्या गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांचे भूसंपादन निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देत वडसा – गडचिरोली रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच गडचिरोली विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक असलेला ओएलएस (Obstacle Limitation Surface) सर्वेक्षण करून त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.