पहिल्याच दिवशी 65 हजार विद्यार्थी येणार नवीन गणवेशात

सोमवारपासून नवीन सत्रारंभ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात नवीन शालेय सत्र सोमवार, दि.23 जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या शाळांमधील 65 हजार 839 विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, बुट आणि सॅाक्स देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हे सर्व विद्यार्थी नवीन गणवेशात शाळांमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जाणार असून शिक्षणमंत्री किंवा सहपालकमंत्री हे गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी येण्याची शक्यता आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेत गावस्तरापासून तर मंत्रीस्तरापर्यंतचे लोकप्रतिनिधी भेट देतील. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ते प्रोत्साहित करतील. शालेय गणवेश आणि बुट-सॅाक्स घेऊन देण्याची जबाबदारी शाळा समितीकडे दिलेली होती. गणवेश कोणत्त्या पद्धतीचा असावा याचे अधिकारही शाळा समितीला दिले आहेत. त्यासाठी शासनाकडून आधीच निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे तो गणवेश विद्यार्थ्यांच्या घरपोच नेऊन देण्याची जबाबदारी शाळा समितीकडे देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी गणवेशात शाळेत येण्याची दक्षता घेतली जात आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

गणवेशासोबतच सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांचे मिळून 1 लाख 9 हजार 782 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा संच मोफत देण्यात येणार आहे. सर्व पाठ्यपुस्तके शाळास्तरावर पोहोचवलेली असल्याने पहिल्याच दिवशी मुलांना पाहुण्यांच्या हस्ते नवीकोरी पुस्तके वाटली जाणार आहेत.