लॉयड्स मेटल्सतर्फे कर्मचाऱ्यांसाठी ‘गौरव तुमचा, अभिमान आमचा’

कॉर्पोरेट प्रशिक्षक गिलबिलेंचे मार्गदर्शन

अहेरी : लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) आणि एलटी गोंडवाना स्किल हब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘गौरव तुमचा, अभिमान आमचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसिद्ध कॉर्पोरेट प्रशिक्षक गोपी गिलबिले आणि त्यांच्या पत्नी यांनी विविध सादरीकरणे, संवादात्मक सत्रे आणि उदाहरणांच्या माध्यमांतून कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना प्रेरणा दिली.

या कार्यक्रमासाठी दिलेल्या संदेशात, एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन म्हणाले, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कर्मचारी आणि कंपनीमधील संबंध मजबूत करणे, संवाद आणि विश्वास वाढवणे, आणि दैनंदिन जीवनात शिस्त कशी राखायची याबद्दल मार्गदर्शन करणे हा होता. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक लोकांना सक्षम बनवण्यासोबत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हितासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. (अधिक बातमी खाली वाचा)

एलटी गोंडवानाचे संचालक डॉ.चरणजितसिंग सलुजा, साई कुमार, रोमित तोंबर्लावार, बलराम सोमनानी, संजय चांगलानी, हर्षवर्धनबाबा आत्राम, तनुश्री आत्राम आणि एलएमईएलचे उपाध्यक्ष (मानव संसाधन) सिद्धार्थ दास या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनोद कावेरी यांनी केले. कर्मचाऱ्यांनी भविष्यात असे उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची विनंती केली.