‘जेएसडब्ल्यू’ स्टील प्लान्टला सिंचनाखालील जमीन नाही !

पर्यायी जागा शोधली जाणार

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यात होऊ घातलेल्या जेएसडब्ल्यू स्टील प्लांटला स्थानिक शेतकऱ्यांच्या सिंचनाखालील सुपिक जमिनी देण्याऐवजी सिंचनाची सुविधा नसलेल्या जमिनी दिल्या जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा हवाला देत तसे सुतोवाच जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाकडे केले आहे.

प्रस्तावित प्रकल्प इतरत्र हलवण्यासंदर्भात तालुक्यातील कुरूड, कोंढाळा, तुळशी, कोकडी, शिवराजपूर, उसेगाव, नैनपूर येथील शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 26 जून रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना दिले. देसाईगंज परिसरातील शेती सिंचनाखाली असून सर्वसामान्य लोकं हे शेतीवर अवलंबून आहेत. इटियाडोहच्या कालव्यामुळे या भागात दुबार पीक घेतले जाते. अशात जेएसडब्ल्यू स्टील प्लांटसाठी याच भागातील शेतीचे अधिग्रहण करण्याचे नियोजन केल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. त्याचबरोबर शेतीसह गावठाण असलेली गावेही उठवली जाऊ शकतात. त्यामुळे परिसरातील लोकं बेघर होण्याची भिती या शेतकऱ्यांनी निवेदनात व्यक्त केली. (अधिक बातमी खाली वाचा)

देसाईगंज परिसरातील कुरूड, कोंढाळा, तुळशी, कोकडी, शिवराजपूर, उसेगाव, नैनपूर येथील शेतकऱ्यांनी 17 जून रोजी कावडे डीएड कॉलेज कुरुड येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरी कावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन परिसरातील बाधित गावातील ग्रामसभांचे ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले होते. त्या अनुषंगाने दि.26 रोजी निवेदन देण्यात आले.

पर्यायी जागा शोधणार- जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्याप्रमाणे सदर प्रकल्पाकरिता पर्यायी जागा शोधण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

निवेदन देताना माजी आमदार कृष्णा गजबे, माजी जिल्हाध्यक्ष तथा देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पारधी, सचिन खरकाटे, अण्णाजी तुपट, शंकर पारधी, केवलराम टिकले, रामचंद्र ठाकरे प्रमोद झिलपे, अरुण राऊत, मंगेश गणवीर, विठ्ठल अवसरे, अमरदीप मेश्राम, खुशाल वाघदरे, चंद्रकांत ढोंगे, उमेश ढोरे, रवी बुल्ले, दिनेश ठाकरे इत्यादी प्रमुख गावातील शेतकरी उपस्थित होते.