गडचिरोली ः दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात चोरट्या मार्गाने दारूची आयात करणाऱ्यांविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. दि.29 च्या रात्री गडचिरोली शहर आणि परिसरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये 2 लाख 88 हजार 800 रुपयांची दारू आणि चारचाकी व दुचाकी वाहने जप्त केली.
गोपनिय माहितीच्या आधारने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उल्हास भुसारी यांनी अधिकारी व अंमलदारांची दोन पथके तयार केली होती. एक पथक मुरखळा गावात जाणाऱ्या रस्त्यावर पाळत ठेवून असताना दुचाकीवरुन विदेशी दारूचे दोन बॅाक्स (किंमत 28 हजार 800 रुपये) वाहून नेणाऱ्या अमित यशवंत रोहणकर (25 वर्ष), रा.मोखाडा ता.सावली याला मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
दुसरे पोलीस पथक कोटगल चौकात सापळा रचुन बसले असताना, एका संशयित दुचाकी वाहनाची तपासणी केली असता चालक व मागे असलेल्या ईसमाच्या मध्ये 40 नग विदेशी दारुच्या बाटल्या ठेवलेल्या आढळल्या. यात येलंधर मलय्या गनबोईनवार (47 वर्षे), रा.कनेरी ता.जि. गडचिरोली आणि विनोद मधुकर मेश्राम (28 वर्षे), रा.पारडी यांना ताब्यात घेऊन गडचिरोली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला.
याशिवाय गडचिरोली कॉम्प्लेक्स परिसरात नाकाबंदीदरम्यान एका संशयित वाहनास थांबण्याचा ईशारा करताच चालकाने वाहनाचा वेग कमी केला आणि दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता वाहनात 2 लाख 48 हजार रुपये किमतीचे देशी दारुचे 31 बॉक्स आढळले. दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. यात आकाश पुरुषोत्तम कापकर (30 वर्षे) रा.सर्वोदय वार्ड क्रमांक 4, गडचिरोली याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
एकाच रात्री वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये दारूसह वाहतुकीसाठी वापरलेली वाहने मिळून 9 लाख 48 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, उपनिरीक्षक दीपक कुंभारे, सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात नापोशि दीपक लेनगुरे, अकबर पोयाम, सतीश कत्तीवार, अंमलदार श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, मंगेश राऊत, चालक मनोहर तोगरवार, माणिक निसार यांनी केली.