
गडचिरोली : जवळच्या सावली तालुक्यातील मौजा भान्सी येथे शिवरायांचे मावळे युवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित डे-नाईट कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून मोठ्या उत्साहात झाला.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना डॉ.नेते म्हणाले, “कबड्डी हा ग्रामीण भागातील लोकप्रिय, शिस्तप्रिय सांघिक खेळ आहे. खेळाडूंनी राष्ट्रभावना, प्रामाणिकपणा आणि खेळभावना जपत मैदानात उतरावे. पंचाचा निर्णय अंतिम मानून खेळल्यास वादविवाद व तंटे टाळता येतात आणि खेळ अधिक आनंददायी व उत्साहपूर्ण होतो.”
यावेळी त्यांनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा उल्लेख करत सांगितले की, भान्सी गावात खनिज विकास निधी अंतर्गत 51 लाख रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली, तसेच सावली तालुक्यात विविध उपक्रमांद्वारे प्रगतीचा वेग कायम ठेवण्यात आला आहे.
गावात आगमनाप्रसंगी ग्रामस्थांनी औक्षण, फटाक्यांची आतिषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात केलेल्या जंगी स्वागताबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. खेळाडूंशी हस्तांदोलन करत शिस्त व संघभावना जपत खेळण्याचा सल्ला देऊन त्यांनी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर, तालुका महामंत्री सचिन तंगडपल्लीवार, धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डीलर्सचे मालक तथा भाजपचे कोषाध्यक्ष जितेंद्र धात्रक, भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष विनोद धोटे, भाजयुमोचे जिल्हा सचिव सुरज किनेकर, कोंडेखलचे उपसरपंच नरेश बाबनवाडे, युवा नेते सदानंद किनेकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बारसागडे, ग्रामपंचायत सदस्य व भाजपा बूथ प्रमुख संतोष पिपरे, पांडुरंग पिपरे, विलास बोरकुटे, सुनील देशमुख, नारायण शेरकी, सुनील कुळमेथे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष मोहित वासेकर, समीर वाकुडकर, अलोक पिपरे, हर्षल भोयर, अंकुश कुळमेथे, करण इटकलवार, करण सरपे, तसेच भान्सी गावातील नागरिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिवस-रात्र कबड्डी स्पर्धेमुळे भान्सी व परिसरातील तरुण खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून ग्रामीण क्रीडा संस्कृतीला नवचैतन्य मिळाल्याची भावना मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
































