Home दैनंदिन बातम्या मुख्यमंत्री, राज्यपालांच्या दौऱ्यासाठी मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविले

मुख्यमंत्री, राज्यपालांच्या दौऱ्यासाठी मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविले

व्हिआयपींचा आगमन मार्ग मोकळा

गडचिरोली : जिल्हा स्टेडिअमवर 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील जनजाती गौरव दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गावरील रस्त्यालगतचे अतिक्रमण हटाविण्यात आले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमन मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा छोट्या व्यावसायिकांनी थाटलेली दुकाने पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.

दोन दिवसांपासून ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. इंदिरा गांधी चौक ते स्टेडिअम पर्यंतच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजुने फूटपाथलगत छोट्या व्यावसायिकांनी अस्थायी दुकाने लावली होती. चहाटपरी, पानठेले, अन्नपदार्थ विक्रेते, वाहन दुरूस्ती करणाऱ्यांसह विविध वस्तू विक्री करणाऱ्यांना या अतिक्रमण हटावचा फटका सहन करावा लागला.

विशेष म्हणजे पूर्वसूचना न देता अचानक ही कारवाई करण्यात आल्याचे सांगत या छोट्या व्यावसायिकांकडून असंतोष व्यक्त केला जात आहे.