समृद्ध आदिवासी संस्कृती, निसर्गाशी अतूट नाते आणि स्वाभिमानाचा वारसा जपणारा गडचिरोली जिल्हा एका ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत प्रथमच होत असलेल्या जनजातीय गौरव दिनाच्या देशस्तरीय मुख्य शासकीय सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्याच्या वाटचालीतील हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांचा हा विशेष लेख.


जनजातीय गौरव दिनाचा राष्ट्रीय सोहळा प्रथमच गडचिरोलीसारख्या मागास आणि अविकसित अशी आतापर्यंत ओळख असलेल्या आदिवासी जिल्ह्यात होत आहे. हा जिल्हावासियांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. या आयोजनामुळे गडचिरोलीची सांस्कृतिक संपदा, आदिवासी समाजाचे योगदान आणि येथील नागरिकांच्या विकासाच्या आकांक्षा देशासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. भगवान बिरसा मुंडांच्या विचारांना अभिवादन करतानाच शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शासकीय सेवांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या सोहळ्याशी जोडला गेला आहे.

राष्ट्रीय सोहळ्याच्या केंद्रस्थानी गडचिरोली

गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात 13 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 नोव्हेंबरच्या मुख्य सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुवाल-ओराम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवातून आदिवासी कला, भाषा आणि परंपरांची व्यापक ओळख निर्माण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच स्थानिक कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे आयोजन महत्त्वाचे ठरेल.

‘धरती आबां’चा स्वाभिमानाचा वारसा

भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी आजच्या झारखंडमधील उलिहातू येथे झाला. आदिवासींच्या पारंपरिक जमिनीवरील हक्कांवर होणारे आक्रमण आणि ब्रिटिश सत्तेच्या शोषणाविरुद्ध त्यांनी समाजाला संघटित केले. सन 1899–1900 मधील त्यांच्या नेतृत्वाखालील ‘उलगुलान’, अर्थात महान उठावाने आदिवासी प्रतिकाराच्या इतिहासात ठसा उमटविला. आपल्या भूमीवरील हक्क, स्वशासन आणि सन्मानाने जगण्याची आकांक्षा त्यांच्या संघर्षाच्या केंद्रस्थानी होती.

‘धरती आबा’ म्हणून आदराने स्मरण केल्या जाणाऱ्या बिरसा मुंडांनी समाजाला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य दिले. त्यांचे जीवनकार्य आदिवासी अस्मिता आणि सामाजिक न्यायासाठी आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीला तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी समाजाच्या योगदानाला अभिवादन करण्यासाठी केंद्र शासनाने 2021 मध्ये 15 नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून घोषित केला.

जल, जंगल, जमीन आणि गडचिरोलीचे लोकजीवन
गडचिरोलीतील आदिवासी समाजाच्या जीवनात जल, जंगल आणि जमीन यांना विशेष स्थान आहे. शेती, वनाधारित उपजीविका, स्थानिक साधनसंपत्तीचे ज्ञान आणि सामूहिक जीवनपद्धती यांतून हे नाते व्यक्त होते. त्यामुळे बिरसा मुंडांचा आपल्या भूमीवरील हक्क आणि सन्मानाने जगण्याचा संदेश येथील लोकजीवनाशी सहज जोडला जातो.
गोंड, माडिया, परधान यांसह विविध आदिवासी समुदायांच्या परंपरा, गोंडी आणि माडिया भाषा, लोकगीते आणि ‘रेला’सारखी नृत्ये हा जिल्ह्याचा समृद्ध ठेवा आहे. या वारशाचे जतन करताना नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे तितकेच महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक अभिमान आणि आधुनिक संधी यांची सांगड घालण्याची दिशा जनजातीय गौरव सोहळा अधोरेखित करतो.
2011 च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या 4 लाख 15 हजार 306 असून, एकूण लोकसंख्येतील तिचे प्रमाण सुमारे 38.70 टक्के आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होणाऱ्या सोहळ्याला व्यापक सामाजिक महत्त्व आहे. आदिवासी समाजाच्या योगदानाचा गौरव करताना त्यांच्या गरजा आणि आकांक्षांशी विकासाची प्रक्रिया जोडण्याची ही संधी आहे.
सांस्कृतिक गौरवाला जनसेवेची जोड
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त पात्र आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ आणि आवश्यक सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी न्यूक्लियस बजेट, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनमन व अन्य योजनांचे लाभवाटप आणि स्वयंरोजगारविषयक मार्गदर्शन करण्यात येईल. 14 नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारकांची स्वच्छता, दीपोत्सव आणि गडचिरोली येथे भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवक पुरस्कारांचे वितरण होणार असून, 15 नोव्हेंबर रोजी मुख्य राष्ट्रीय सोहळा होईल.
16 नोव्हेंबर रोजी सेवा शिबिरांतून आधार अद्ययावतीकरण, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अर्ज भरण्यासाठी सहाय्य आणि कृषी सेवांबाबत मार्गदर्शन केले जाईल. 17 नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी, सिकलसेल जनजागृती, माता-बाल आरोग्य व पोषणविषयक उपक्रम राबविले जातील. 18 नोव्हेंबर रोजी शिष्यवृत्ती, जात वैधता, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनविषयक मार्गदर्शनाने सप्ताहाचा समारोप होईल. दुर्गम भागातील नागरिकांना विविध सेवांची माहिती आणि सहाय्य मिळवून देण्यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरतील.
गडचिरोलीतील हा सोहळा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि राष्ट्राच्या जडणघडणीतील योगदानाचा गौरव करणार आहे. या गौरवाला सेवा सप्ताहातील लोककल्याणकारी उपक्रमांची जोड मिळणार आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणारी आणि शिक्षण व कौशल्याच्या बळावर पुढे जाणारी नवी पिढी घडविण्यासाठी हे आयोजन प्रेरणादायी ठरेल. संस्कृतीचा सन्मान, हक्कांची जाणीव आणि प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविण्याचा प्रयत्न हीच भगवान बिरसा मुंडा यांना अर्थपूर्ण आदरांजली ठरेल.
— गजानन जाधव
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.







































