गडचिरोली : नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे प्राणघातक अपघात आणि पक्ष्यांची होणारी जीवितहानी रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सार्वजनिक सूचना जारी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक आर्थिक दंडाची कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. प्रस्तावित दंडात्मक कारवाई खालीलप्रमाणे राहणार आहे.
प्रस्तावित दंडात्मक कारवाई
* अल्पवयीन मुलांसाठी पालकांना दंड : जर एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळला, तर त्याच्या पालकांना 50 हजार रुपये दंड का करू नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.
* प्रौढ व्यक्तींना दंड : कोणतीही प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास, तिला 50 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.
* विक्रेत्यांवर मोठी कारवाई : ज्या विक्रेत्यांकडे नायलॉन मांजाचा साठा आढळेल, किंवा जे याची विक्री करतील, त्यांना प्रत्येक उल्लंघनासाठी 2 लाख 50 हजार रुपये दंड आकारण्याचे प्रस्तावित आहे.
जनतेला म्हणणे मांडण्याची संधी
न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार, ही कारवाई अंतिम करण्यापूर्वी जनतेला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. ज्यांना या प्रस्तावित दंडात्मक कारवाईविरुद्ध निवेदन सादर करायचे आहे, ते 5 जानेवारी 2026 रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहून आपले म्हणणे मांडू शकतात. कोणीही सुनावणीला हजर राहिले नाही, तर जनतेचा या दंड वसुलीस कोणताही आक्षेप नाही, असे मानले जाईल.
































