आरमोरी : मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार यांचे वडील डॉ.दिवाकर मारकवार यांचे शुक्रवार, दिनांक 9 जानेवारी रोजी पहाटे 3.30 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. मारकवार परिवाराने जुन्या चालीरीतींना बगल देत आरमोरी येथील गाढवी नदीकाठावरील दहनभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार केले.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य केंद्रात डॅा.मारकवार यांनी 30 वर्षे सेवा दिली. मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा अमोल, एक मुलगी, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. कॅाम्युनिस्ट विचारसरणीचे असलेल्या मारकवार परिवाराने मुंडन, तेरवी यासारख्या जुन्या चालीरीतीप्रमाणे सोवळे न करता दहनभूमीच्या साफसफाईचे काम करण्यासाठी आरमोरी नगर परिषदेला 22 हजार रुपये देवून अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले.
अंत्यसंस्कारादरम्यान भाग्यवान खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेऊन त्यांच्या प्रामाणिक कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी भाकपचे नेते डॉ.महेश कोपूलवार, देवराव चवळे, विनोद झोडगे, शिवसेनेचे नेते हेमंत जंबेवार, शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, प्रहारचे जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक, चंदू पारखी, काशिनाथ शेबे, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सहारे, वामनराव सावसागडे, चंदू वडपल्लीवार, सत्यनारायण चकीनारपवार, राजू मारकवार, महेश तितिरमारे, सुधीर माटे, विनोद मडावी, विजय वाकडे, केशव बांबोळे, संजय वाकडे, प्रशांत खोब्रागडे यांच्यासह अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या.
































