अहेरी : आलापल्लीलगत नागेपल्ली भागात एका 14 वर्षीय बालकाने क्षुल्लक कारणातून रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. मित्रासोबत बाहेर फिरायला जाण्यास वडिलांनी नकार दिल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते.
ऐनोस असे मृत मुलाचे नाव आहे. ऐनोसने त्याच्या वडीलांकडे मित्रासोबत फिरायला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र वडिलांनी त्याला जाण्यास मनाई केली. दरम्यान रविवारी (दि.22) सकाळी 8 वाजेच्या सुमारास ऐनोसचे आई-वडील प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते. त्यावेळी ऐनोस घरी एकटाच होता. याचवेळी त्याने रागाच्या भरात घरातील सिलिंग फॅनला फास लटकवून गळफास लावून घेतला.
चर्चमधून घरी परतल्यानंतर ऐनोसच्या वडीलांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी आवाज देऊनही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी कसाबसा दरवाजा उघड्रन आत प्रवेश केला तेव्हा ऐनोस फासावर लटकलेला आढळला. त्यांनी तत्काळ पत्नीच्या मदतीने त्याला खाली उतरवून दुचाकीवरून नागेपल्लीच्या रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती ऐनोसला मृत घोषित केले.
याप्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात बीएनएस 2023 च्या कलम 194 अन्वये आकस्मिक मत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक राणी कराड करत आहे.
































