अभाविपच्या प्रांत अधिवेशनाचे मंत्री उईकेंच्या हस्ते उद्घाटन

विदर्भातील तरुणाई एकवटली

गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला शुक्रवारी गडचिरोलीत सुरुवात झाली. येथील सुमानंद सभागृहात (भगवान बिरसा मुंडा नगरी) या तीन दिवसीय अधिवेशनाचे उ‌द्घाटन आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते झाले. देव, देश, धर्म याची समाजाला गरज आहे. पण काही लोक धर्मांतराचा प्रयत्न करत आहेत. भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांना अपेक्षित असलेला समाज घडविण्यासाठी, आणि संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी मंत्री उईके यांनी तरुणाईला केले.

यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.वीरेंद्र सोलंकी, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रा.श्रीकांत पर्बत, प्रांत मंत्री देवाशिष गोतरकर, स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार डॅा.मिलिंद नरोटे, स्वागत समितीचे सचिव गोविंद सारडा, गडचिरोली नगर अध्यक्ष प्रा.सुनिता साळवे, मंत्री संकेत म्हस्के उपस्थित होते.

याशिवाय माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते, माजी आमदार डॅा.देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांच्यासह अनेक पदाधिकारी प्रेक्षकांमध्ये विराजमान होते.

देवी सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पॅरा आॅलिम्पिक धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या श्वेता कोवे या दिव्यांग विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा.अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांप्रती आपुलकी व्यक्त करून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध धावून येणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मुख्य अतिथी अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.वीरेंद्र सोलंकी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात व बलिदानात विद्यार्थी शक्तीचा महत्वाचा वाटा राहिला आहे. मंगल पांडे, भगत सिंह यांच्यासारख्या अनेक युवकांचा यात समावेश होता. स्वागतपर भाषणातून आ.डॅा.मिलिंद नरोटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर स्वागत समितीचे सचिव गोविंद सारडा यांनी आभार प्रदर्शन केले.

या संमेलनासाठी संपूर्ण विदर्भातून विद्यार्थी प्रतिनिधी दाखल झाले आहेत. विविध विषयांवरील सत्रांमधून वैचारिक मंथन या अधिवेशनात होणार आहे.