गडचिरोली : गडचिरोलीच्या सामाजिक-आर्थिक विकासात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) ने देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. पहिल्या तुकडीतील 193 प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि लॅायड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या प्रशिक्षण संस्थेमुळे गडचिरोलीत उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. बी.प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीतून कुशल व रोजगारक्षम युवक तयार होत असल्याने या प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
गडचिरोलीतील युवकांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी बी.प्रभाकरन सातत्याने कटिबद्ध राहिले आहेत. स्थानिक तरुणांना सक्षम बनवून त्यांना उद्योगासाठी सज्ज करणे आणि जिल्ह्यात विकसित होत असलेल्या औद्योगिक परिसंस्थेशी त्यांची कौशल्ये संलग्न करणे, ही त्यांची प्रमुख संकल्पना आहे.
आकांक्षा आणि रोजगार यामधील दुवा म्हणून संकल्पित करण्यात आलेल्या या कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे उद्दिष्ट तरुणांना व्यावहारिक, व्यावसायिक व जागतिक स्तरावर उपयुक्त कौशल्ये प्रदान करून कौशल्यातील तूट भरून काढणे हे आहे. यातून युवकांना भारताच्या औद्योगिक प्रगतीचा सक्रिय भाग बनविल्या जात आहे.
प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना प्रभाकरन यांनी पहिल्या तुकडीचे अभिनंदन केले. त्यांचे औपचारिकरित्या लॉयड्स कुटुंबात स्वागत केले. गडचिरोलीला “भारताचे दुसरे जमशेदपूर” बनवण्याच्या आपल्या संकल्पनेचा पुनरुच्चार करत, त्यांनी सांगितले की, एलएमजीएसई अंतर्गत मिळालेले प्रशिक्षण व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विविध उद्योगांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
प्रभाकरन यांनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या कर्मचारी समभाग मालकी योजना (ESOP) विषयी माहिती देताना सांगितले की, या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना कंपनीचे समभाग दिले जातात, ज्यामुळे ते कंपनीच्या प्रगतीचे भागीदार बनतात. त्यांनी स्पष्ट केले की, हे प्रशिक्षणार्थी केवळ रोजगारासाठी सज्ज नाहीत, तर केंद्रित कौशल्य विकास, संधी आणि विश्वास यांच्या बळावर गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे भवितव्य कसे बदलू शकते, याचे ते प्रतीक आहेत. त्यांच्या भाषणामुळे उपस्थितांमध्ये आत्मविश्वास, आशा आणि सकारात्मकतेची भावना निर्माण झाली.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, गडचिरोली वेगाने एक महत्त्वाचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे. सुमारे 3 लाख कोटींची गुंतवणूक येथे होत आहे, ज्यामुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. युवकांना कौशल्य प्रशिक्षण व शाश्वत रोजगार देणाऱ्या संस्थांशी जोडणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. कौशल्य विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल पंडा यांनी लॉयड्स मेटल्सचे एमडी बी.प्रभाकरन यांचे कौतुक केले.
एलएमजीएसई या कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात 11 डिसेंबर रोजी झाली. त्या दिवशी पहिल्या तुकडीसाठी प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. या टप्प्यामुळे लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिपने गडचिरोलीतील युवकांसाठी परिवर्तन घडवून आणणारा प्रभावी घटक म्हणून ठोस ओळख निर्माण केली आहे.































