देसाईगंज : विसोरा ग्रामवासी शंकरपट समितीच्या सौजन्याने विसोरात तीन दिवसीय बैलांच्या जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. या शंकर पटामध्ये प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शेतकरी बांधवांच्या आनंदात सहभागी होऊन संवाद साधला.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार रामदास मसराम, तर अध्यक्ष म्हणून माजी आमदार कृष्णा गजबे, तसेच सहउद्घाटक माजी सभापती नाना नाकाडे, प्रमुख अतिथी विसोराचे सरपंच रमेश कुथे, पोलीस पाटील श्रीमती सहारे, डॉ.अमोल बुद्दे, नितीन बन्सोड, अॅड.प्रमोद बुद्धे, चिंटू नाकाडे, धनपाल मिसार, विकास प्रधान, ग्रामसचिव देशमुख, हिरालाल अवसरे, प्रल्हाद वघारे, महेंद्र नाकाडे, तुलाराम नेवारे आदि पदाधिकारी, तसेच शेतकरी आणि विसोरा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंकरपट स्पर्धेत विविध भागांतून आलेल्या बैलजोड्यांनी सहभाग घेतला. शंकरपट म्हणजे केवळ एक स्पर्धा नसून शेतकरी संस्कृतीशी नाळ जोडलेली ही परंपरा परिश्रम, जिद्द, ताकद आणि शिस्त यांचे प्रतीक मानली जाते. ग्रामीण क्रीडा, शेतकरी परंपरा आणि स्थानिक प्रतिभेला व्यासपीठ मिळावे यासाठी असे आयोजन सातत्याने होत राहिले पाहिजे, असे मार्गदर्शन यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना मा.आ.कृष्णा गजबे यांनी केले.
या शंकरपट स्पर्धेमुळे विसोरा गावाची ओळख विदर्भभर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तसेच शंकरपटाचे निमित्त साधून रात्री विसोरा गावामध्ये एकाच दिवशी दोन नाटक आणि तीन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, आयोजकांची मेहनत आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे हा सोहळा यशस्वी ठरला.
































