विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गडचिरोली जिल्हा संघ अव्वल

राज्यस्तरावर करणार प्रतिनिधीत्व

गडचिरोली : महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या गोंदिया जिल्हा संघाकडून सडक अर्जुनी येथे आयोजित 14 वर्षाखालील मुले-मुलींची नागपूर विभागीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नागपूर विभागातील जिल्हा संघांनी सहभाग घेतला. त्यात गडचिरोली जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला.

या संघात सौरव तानाजी मराठी (कर्णधार), सनम दीपक राऊत (उपकर्णधार), समीर जागेश्वर मराठे (राजे धर्मराव हायस्कूलचे विद्यार्थी), ओम आनंदराव वसाके, आयुष नानाजी सातारे, आयुष अनुपम वसाके (जिल्हा परिषद केंद्र शाळा वेलगुरूचे विद्यार्थी) व क्षितिज देवानंद गदेकर (राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली) या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

प्रशिक्षक यशोधन जयंत गजभिये व व्यवस्थापक अमित शेंडे यांच्या मार्गदर्शनामुळे व परिश्रमामुळे या विभागीय स्पर्धेत गडचिरोली संघाने नेत्रदीपक खेळ करत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला. गडचिरोली मुलांच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नागपूर विभागीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेलगुरच्या संघाला ब्लू स्टार क्लब वेलगुर व न्यू स्टार क्लब वेलगूर यांनी मोलाचे आर्थिक सहकार्य केले. तसेच अहेरी पत्रकार संघटनेचे सदस्य दीपक चुनारकर यांनी सहकार्य केले. अमोल दुर्गे यांनी गाडीची व्यवस्था करण्यास मदत केली. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गडचिरोली संघाचा माजी मंत्री आ.राजकुमार बडोले व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.