अहेरीतील वादग्रस्त चार मजली इमारत पाडण्यास सुरूवात !

कंकडालवार यांचे प्रयत्न निष्फळ

अहेरी : गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्या बेकायदेशीर इमारत बांधकामावर अखेर मंगळवारी (दि.3) नगर पंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. त्यांची चार मजली इमारत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यास सुरूवात करण्यात आली. पोलीस संरक्षणात आणि मुख्याधिकारी गणेश लहाने यांच्या उपस्थितीत इमारत पाडण्याचे काम सुरू झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अहेरीलगत गडअहेरी भागात असलेल्या कंकडालवार यांच्या या इमारतीचे बांधकाम नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्याची तक्रार होती. यावरून नगर पंचायतीने कंकडालवार यांना दोन महिन्यांपूर्वी कारवाईबाबत सूचित केले होते. मात्र, हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत आणि प्रशासकीय फेऱ्यात अडकल्याने कारवाई कधी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

कंकडालवार यांनी परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे सादर केली नसल्याने ते अतिक्रमण मानून नगर पंचायत मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी तीन वेळा नोटीस बजावली. पण कागदपत्रे सादर करण्याऐवजी कंकडालवार यांनी कनिष्ठ न्यायालयाकडे अपिल करून संभाव्य कारवाईला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अपिल न्यायालयाने फेटाळल्यानंतर अपर न्यायालयाकडे अपिल केले, पण तिथेही दाद मिळाली नसल्याचे सांगितले जाते.

अखेर प्रशासकीय कारवाईला सुरूवात

मंगळवारी सकाळपासूनच प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तात या इमारतीचे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. राजकीय दबावामुळे ही कारवाई रखडणार की काय? अशी शंका व्यक्त केली जात होती, मात्र शासन आणि न्यायालयाने हिरवा कंदील दाखवताच प्रशासनाने थेट कारवाईला सुरुवात करून ‘कायदा सर्वांसाठी समान’ असल्याचा संदेश दिला आहे.

कंकडालवार यांच्यासाठी धक्कादायक

एकेकाळी अहेरी आणि परिसरात दबदबा असलेले अजय कंकडालवार यांच्यासाठी हा राजकीय धक्का मानला जात आहे. या कारवाईमुळे ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कंकडालवार यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ नगर पंचायतच नव्हे, तर इतरही काही सरकारी विभागांकडून कंकडालवार यांच्या व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारवाईमुळे अहेरी परिसरातील इतर अवैध बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत.