Home पब्लिक प्रॉब्लेम ‘अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना सुविधा कमी पडू देणार नाही’

‘अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना सुविधा कमी पडू देणार नाही’

नगराध्यक्षांकडून दुरावस्थेची पाहणी

गडचिरोली : शहरातील आरमोरी मार्गावरील कठाणी नदी परिसरात असलेली स्मशानभूमी दीर्घकाळच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता व अपुऱ्या सुविधांच्या विळख्यात अडकली होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी संयुक्तपणे पाहणी करत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने व तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील, असा ठाम निर्धार यावेळी नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

पाहणीदरम्यान पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नसणे, शौचालयांची अपुरी सुविधा, अंत्यविधीसाठी आवश्यक सोयींचा अभाव, तसेच परिसरातील अस्वच्छता स्पष्टपणे दिसून आली. नागरिकांच्या दुःखाच्या क्षणी मूलभूत सुविधांचा अभाव हे गंभीर असून, अशा प्रकारचे दुर्लक्ष यापुढे खपवून घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मांडली.

स्मशानघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर पसरलेली माती, ठिकठिकाणी साचलेला कचरा व घाण पाहून संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ साफसफाईचे आदेश देण्यात आले. परिसर स्वच्छ, सुरक्षित व सन्मानजनक ठेवण्यासाठी नियमित देखरेख आणि जबाबदारी निश्चित केली जाईल, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

स्मशानभूमी हा अत्यंत संवेदनशील व नागरिकांच्या भावनांशी निगडित असलेला परिसर असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मान, सुविधा व स्वच्छ वातावरण मिळणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे, असे नगराध्यक्ष निंबोरकर यांनी सांगितले. नगरसेवक सागर निंबोरकर यांनीही सर्व कामे प्राधान्याने, वेळेत व दर्जेदार केली जातील, अशी ठोस भूमिका मांडली.

या पाहणीदरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिंदुरकर, कनिष्ठ अभियंता खामनकर, तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.