
गडचिरोली : दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे गुरूवारी गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाले. देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली आणि चामोर्शी येथे विविध क्षेत्रातील नागरिकांनी दर्शन घेतल्यानंतर मार्कंडेश्वर मंदिरालगतच्या वैनगंगा नदीघाटावर त्या अस्थींचे गुरूवारी संध्याकाळी विसर्जन करण्यात आले. गडचिरोलीच्या दौऱ्यावर असलेले सहपालकमंत्री आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनीही इंदिरा गांधी चौकात सदर अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजही वाहिली.
सर्वप्रथम देसाईगंज येथे अस्थिकलशाचे आगमन झाल्यानंतर आ.रामदास मसराम, माजी जि.प.सभापती नाना नाकाडे, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, युनूस शेख, नगरसेवक पिंकू बावणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर आरमोरी येथे हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. दुपारी 2 वाजताच्या सुमारास अस्थिकलश गडचिरोलीत आणण्यात आला. इंदिरा गांधी चौकात तात्पुरत्या उभारलेल्या स्टेजवर हा कलश ठेवण्यात आला. त्या ठिकाणी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आ.डॅा.मिलिंद नरोटे, माजी आ.डॅा.देवराव होळी, माजी आ.रामकृष्ण मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा न.प.चे पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर, शिवसेनेचे हेमंत जंबेवार, राकेश बेलसरे, अमिता मडावी, डॅा.सोनल कोवे, नगरसेवक रमेश चौधरी अशा विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर अस्थिकलश चामोर्शी येथे नेण्यात आला. त्या ठिकाणीही अनेक लोकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतल्यानंतर मार्कंडा देव येथील उत्तरवाहिनी वैनगंगा नदीघाटावर विधीवत अस्थिविसर्जन कार्यक्रम झाला.
































