आजपासून पोलीस भरती सुरू, 744 जागांसाठी 27 हजार अर्ज

551 अधिकारी-कर्मचारी तैनात

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या एकूण 744 जागांसाठी आज पहाटेपासून मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. यात चालक (शिपाई) पदाच्या 27 जागांसाठी 3296 उमेदवारांनी, तर शिपाई पदाच्या 717 जागांसाठी 23 हजार 791 अशा एकूण 744 जागांसाठी 27 हजार 87 महिला-पुरूष उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आजपासून 8 मार्चपर्यंत, म्हणजे जवळजवळ एक महिनाभर शारीरिक क्षमता (मैदानी) चाचण्या चालणार आहेत.

यात दि.11 ते 13 पर्यंत चालक पदासाठी, तर दि.14 पासून पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक क्षमता चाचण्या घेतल्या जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्यांनाच या पदभरतीत संधी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी एकूण 69 अधिकारी आणि 482 पोलीस अंमलदार असे एकूण 551 मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.

27 चालक पोलीस शिपाई पदाकरिता 3296 उमेदवारांनी अर्ज सादर केले, त्यात 2797 पुरुष उमेदवार आणि 499 महिला उमेदवार आहेत. तसेच पोलीस शिपाई पदाच्या 717 जागांसाठी 23,791 उमेदवारांनी अर्ज केले, त्यापैकी 16,310 पुरुष उमेदवार, तर 7,481 महिला उमेदवार आहेत.

दररोज सरासरी 1500 उमेदवारांची चाचणी

आज पहिल्या दिवशी 1300 उमेदवारांची, आणि त्यानंतर दरदिवशी सरासरी 1500 उमेदवारांची शारीरिक क्षमता (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाच्या चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सर्व उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र https:// policerecruitment2024. mahait.org या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे, तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या मैदानी चाचणी तारीख लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्रासह पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे हजर राहण्याची सूचना गडचिरोली पोलीस दलामार्फत करण्यात आली आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरिक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची 1600 मी. धावणे (पुरुष), 800 मी.धावणे (महिला), 100 मी.धावणे (पुरुष व महिला)च्या चाचणी करीता (RFID) Based Technology चा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच गोळाफेक चाचणीकरीता Prism Technology आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

पावसाचा व्यत्यय आल्यास पुढील तारीख

मैदानी (शारीरिक क्षमता) चाचणीमध्ये उत्तीर्ण होवुन लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची बायोमॅट्रीक पध्दतीने हजेरी घेवुन पडताळणी करण्यात येणार आहे. जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. सोबतच काही उमेदवारांना वेगवेगळया पदाकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीकरीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. उमेदवारांना इतर काही अडचणी आल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल.

प्रलोभनाला बळी पडू नका

सदर पदभरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा वापर करु नये. असे करताना आढळून आल्यास उमेदवारी तात्काळ रद्द करुन त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये, तसेच कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र.8806312100 यावर, तसेच उपविभागीय कार्यालय /पोस्टे/ उपपोस्टे/ पोमकें येथे माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले.