नैनपूरच्या अवैध रेतीसाठ्यासाठी तहसीलदारांना दिली नोटीस

आमगावच्या घाटातून तस्करी सुरू

जप्त केलेला हाच तो शेतातील रेतीसाठा

देसाईगंज : तालुक्यातील काही घाटांवरून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे. तहसीलदार कार्यालयापासून अवघ्या दिड किलोमीटरवर असलेल्या नैनपूर भूमापन क्रमांक 134 मध्ये अंदाजे 180 ब्रास रेतीच्या अवैध साठ्याबाबत तहसीलदारांनी दंडात्मक, तसेच फौजदारी कारवाई न केल्याने उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी तहसीलदार प्रिती डिडूळकर यांना नोटीस बजावत कारण स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

तहसीलदारांना बजावलेल्या पत्रात नमुद केल्यानुसार, मौजा नैनपूर येथील एका शेतीमध्ये अवैध रेतीसाठा आढळून आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी प्रधान यांनी देसाईगंज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व ग्राम महसूल अधिकारी विसोरा यांना मोक्यावर पाठवून पंचनामा करण्यात आला. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी विसोरा यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयास दिलेल्या अहवालानुसार, विष्णू तकतानी रा.नैनपूर यांच्या मालकीच्या भुमापन क्रमांक 134 मध्ये अंदाजे 180 ब्रास अवैध रेतीचा साठा आहे. सदर साठा हा तहसील कार्यालयापासून दिड किलोमीटर अंतरावर आहे. तरीसुद्धा तहसील कार्यालयाकडून उपविभागीय कार्यालयास त्याबाबत अवगत करणे आणि संबंधित साठ्यावर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करणे अनिवार्य होते. परंतु तहसील कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. ही गंभीर स्वरूपाची बाब आहे. तहसीलदारांनी कर्तव्यामध्ये दिरंगाई व निष्काळजीपणा केल्याचे नमुद करत एसडीओंनी 24 तासात लेखी स्पष्टीकरण मागितले. परंतू त्याबाबत तहसीलदारांकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचे समजते.

अधिकाऱ्याच्या मुकसंमतीने रात्रीस खेळ चाले

देसाईगंज येथील रेती तस्करांकडून आमगाव रेतीघाटातून मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत खुलेआम रेतीची तस्करी केली जात आहे. महसुल विभागाचे बरेच अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने याचा गैरफायदा घेत सुटीच्या दिवशी व शनिवार, रविवारला रेती तस्करांचे चांगलेच फावते. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे, याबाबतची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांना असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेती तस्करांनी नदी पात्रात मोठमोठे खड्डे तयार केले आहेत. मात्र कारवाई का केली जात नाही, हे न उलगडणारे कोडे आहे.