3 कोटींच्या वाचनालय इमारतीच्या बांधकाम निविदेत गौडबंगाल !

एटापल्ली सीओंच्या भूमिकेवर संशय

एटापल्ली : एटापल्ली नगर पंचायतकडून जिल्हा खनिज विकास निधीतून (डीएमएफ) नगरात 3 कोटी रुपये खर्चुन सुसज्ज वाचनालयाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी महिनाभरापूर्वी इ-निविदा प्रसिध्द करण्यात आली. मात्र ठरलेल्या दिवशी 28 जानेवारीला निविदा उघडायची असताना ती अजूनही उघडण्यात आलेली नाही. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचा संशय व्यक्त करत याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी एटापल्ली नगर पंचायतचे बांधकाम समिती सभापती निजान पेंदाम, नगरसेवक मनोहर बोरकर, किसन हिचामी व दीपयंती पेंदाम यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वाचनालयाच्या बांधकामासाठी नगर पंचायतने दि.19 जानेवारी रोजी ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. सदर निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांनी रितसरपणे आणि सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून ऑनलाईन पध्दतीने निविदा सादर केली आहे. मात्र मुख्याधिकारी प्रणय तांबे व प्रशासनाकडून ही संपूर्ण निविदा प्रक्रिया पारदर्शक पध्द्तीने राबविण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. मुख्याधिकारी तांबे यांच्या मर्जीतल्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर एका पात्र कंत्राटदाराने निविदा भरल्यामुळे, सदर निविदा नियमानुसार ठरलेल्या दिवशी (28 जानेवारीला) उघडण्याचे टाळण्यात आले. आता 27 दिवसांचा कालावधी लोटुन देखील निविदा उघडण्यात आल्या नसल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

विशिष्ठ कंत्राटदाराला फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर ही प्रक्रिया थांबवली आणि त्यात गैरप्रकार केला, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. ही कृती पूर्णपणे मनमानी, बेकायदेशिर आणि सार्वजनिक निधीच्या हिताविरूध्द आहे. अशा प्रकारच्या कृतीमुळे शासनाच्या पारदर्शक कारभाराच्या धोरणाचे उल्लंघन होत असून इतर प्रामाणिक आणि पात्र कंत्राटदारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या प्रकरणात तात्काळ लक्ष घालुन संपूर्ण निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, तथा चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर निविदा प्रक्रियेला स्थगिती देऊन दोषी आढळणाऱ्यांना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकिय व कायदेशिर कारवाई करण्याची मागणी सभापती निजान पेंदाम, नगरसेवक मनोहर बोरकर, किसन हिचामी व दीपायंती पेंदाम यांनी केली आहे.

दरम्यान याप्रकरणी दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी प्रणय तांबे यांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कॅाल स्वीकारला नाही.