गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर इंग्रजी विभाग आणि आदिवासी अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वैरागड : गोंडकालीन ऐतिहासिक वारसा’ या उपक्रमांतर्गत वैरागड येथील किल्ल्यावर एक दिवसीय अभ्यास भेट आयोजित केली होती. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या वैभवशाली इतिहासाचे आणि गोंडकालीन स्थापत्यशास्त्राचे बारकावे प्रत्यक्षात अनुभवले.
याप्रसंगी तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, कढोली येथील प्रा.प्रदीप बोडने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “१२ व्या शतकातील हत्तीगुंफा शिलालेखात ‘वज्रगड’ असा उल्लेख आढळतो, ज्याचा अपभ्रंश होऊन पुढे ‘वैरागड’ असे नाव पडले. हा किल्ला उत्तम वास्तुकलेचे उदाहरण आहे. मात्र, हा अमूल्य वारसा पुरातत्व विभागाकडून अजूनही पूर्णपणे संवर्धित झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ऐतिहासिक वास्तू आणि साहित्याचे संवर्धन करणे ही केवळ काळाची गरज नसून ते आपले नैतिक कर्तव्य आहे,” असे यावेळी प्रा.बोडणे म्हणाले.
इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी या भेटीदरम्यान किल्ल्यावरील शिल्पकला, प्राचीन मंदिरे, तटबंदी आणि भौगोलिक रचनेचा अभ्यास केला. गडचिरोली जिल्ह्याला लाभलेला हा वारसा केवळ पर्यटन स्थळ नसून तो संशोधनाचा एक समृद्ध विषय आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून झाली. तरुण पिढीने या वारशाच्या जतनासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
सदर अभ्यास भेटीसाठी इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.विवेक जोशी, आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.वैभव मसराम, प्रा.डॉ.प्रमोद जावरे तसेच पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
































