लग्नाचे आमिष दाखवत शोषण करून परिचारिकेचा गर्भपात

धोकेबाज कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहेरी : प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवत एका आदिवासी परिचारिकेचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि नंतर लग्नास नकार देणाऱ्या धोकेबाज प्रेमवीरावर पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि अॅट्रॅासिटीचा गुन्हा दाखल केला.
अभिषेक आईलवार (रा.अहेरी) असे त्याचे नाव असून तो व्यवसायाने कंत्राटदार असल्याचे सांगितले जाते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जुलै 2024 ते आॅक्टोबर 2025 यादरम्यान पीडित युवतीशी प्रेमाचे नाटक करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती राहिल्यानंतर तिची बदनामी होण्याची भिती दाखवत बळजबरीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतर लग्नासाठी तगादा लावला असताना आरोपीने लग्नाला नकार दिला. एवढेच नाही तर गर्भधारणेचे सर्व पुरावे नष्ट केले.

आपल्याशी धोका झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित परिचारिकेने अहेरी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी अभिषेक याच्यावर कलम 69, 241, 351 (1) भान्यासं आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे करत आहेत.