Home दैनंदिन बातम्या तीन कोटीच्या निविदा प्रक्रियेची जिल्हा प्रशासनाकडून दखल

तीन कोटीच्या निविदा प्रक्रियेची जिल्हा प्रशासनाकडून दखल

मुख्याधिकाऱ्यांना मागितले उत्तर

एटापल्ली : एटापल्ली नगर पंचायतने जिल्हा खनिज निधीतून 3 कोटी रुपये खर्चून वाचनालयाची सुसज्ज इमारत बांधकामासाठी दिड महिन्यापूर्वी इ-निविदा प्रसिद्ध केली होती. पण प्रत्यक्षात निविदा ठरलेल्या दिवशी उघडलीच नाही. त्यामुळे विशिष्ट कंत्राटदाराला हा कंत्राट देण्याच्या प्रयत्नात निविदा प्रक्रियेत घोळ केला जात असल्याची तक्रार नगर पंचायतच्या बांधकाम सभापतींसह काही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार या निविदा प्रक्रियेबद्दलचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्याधिकारी प्रणय तांबे यांना देण्यात आले आहे.

एटापल्ली नगर पंचायतने 19 जानेवारी रोजी सदर ई-निविदा प्रसिद्ध केली होती. 3 कोटी रुपये खर्चुन सार्वजनिक वाचनालयाची इमारत व इतर सुविधांसाठी 4 कंत्राटदारांनी रितसरपणे आणि सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून ऑनलाईन पध्दतीने निविदा सादर केली होती. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या जवळच्या आणि मर्जीतल्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर एका पात्र कंत्राटदाराने निविदा भरल्यामुळे, सदर निविदा ठरलेल्या दिवशी (28 जानेवारीला) उघडलीच नाही, असा ठपका तक्रारकर्त्यांनी ठेवला आहे. महिनाभराचा कालावधी होऊनही निविदा उघडण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.

ही संपूर्ण निविदा प्रक्रिया पारदर्शक पध्द्तीने राबविण्यात आली नसल्याचे बांधकाम सभापती निजान पेंदाम, नगरसेवक मनोहर बोरकर, किसन हिचामी, नगरसेविका दीपयंती पेंदाम यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे केली होती. विशिष्ठ कंत्राटदाराला फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया थांबवली आहे, आणि त्यात गैरप्रकार केला आहे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला.

याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, नगर पालिका प्रशासनाच्या जिल्हा सहआयुक्त अर्चना मेंढे यांनी एटापल्ली नगर पंचायतचे मुख्याधिकारी प्रणय तांबे यांना पत्र देऊन याप्रकरणी काय कार्यवाही केली त्याचा अहवाल 7 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकिय व कायदेशिर कारवाई करण्याची मागणी सभापती निजान पेंदाम, नगरसेवक बोरकर, हिचामी व पेंदाम यांनी केली आहे.