गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव ‘भरारी 2025-26’ चा समारोप बक्षीस वितरणाने उत्साहात झाला. या स्पर्धांमध्ये चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट सादरीकरणातून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे होते. यावेळी विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ.प्रिया गेडाम, उपयोजित अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.सुरेखा हजारे, प्रा.डॉ.शिल्पा आठवले, प्रा.डॉ.धैर्यशील खामकर, प्रा.राहुल ढबाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, कुठल्याही स्पर्धेत यश-अपयश हे येतच असते. विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी खचून न जाता नव्या उत्साहाने पुन्हा सहभागी होऊन अधिक उंच भरारी घ्यावी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ दरवर्षी विविध उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करीत राहील, ज्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या अधिनस्थ महाविद्यालयांमधील सुमारे 585 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली कला, सर्जनशीलता आणि कौशल्य यांचे प्रभावी दर्शन घडविले. कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करत त्यांचा उत्साह वाढवला.
संगीत स्पर्धेसाठी विजया रोहित कांबळे, विकी भैसारे व संदेश सोनुले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नाट्य स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभाग विभाग प्रमुख डॉ.संयुक्ता थोरात, प्रफुल निरुडवार व प्रा.रोहित कांबळे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. नृत्य या कला प्रकारासाठी डॉ.संयुक्ता थोरात, राहुल फुलके व महेश वाढई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच ललित कला स्पर्धेसाठी वैशाली रागीट व संध्या येलेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहात स्पर्धेच्या यशात मोलाचे योगदान दिले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि विविध कलागुणांच्या अविष्कारामुळे ‘भरारी’ कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला नवे पंख देणारे प्रभावी व्यासपीठ निर्माण केले.
विविध स्पर्धांमधील विजेते
नृत्य स्पर्धेत एस.पी.महाविद्यालय चंद्रपूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ललित कला स्पर्धेत जनता महाविद्यालय चंद्रपूर विजेते ठरले. नाटक स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय चंद्रपूर यांनी बाजी मारली, तर संगीत स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. साहित्य स्पर्धेत कर्मवीर महाविद्यालय मुल यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील एकूण गुणांच्या आधारे सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांनी सर्वसाधारण विजेतेपद तर ग्रामगीता महाविद्यालय चिमूर यांनी सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते विजेत्या महाविद्यालयांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समन्वयक रोहित बापू कांबळे, आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्रा.अंतबोध बोरकर, रितिक कोहळे, मनोज बिरहारी, अजय राठोड, विद्यार्थी विकास विभागाचे सुरज गेडाम, सिद्धांत झाडे यांचे विशेष योगदान लाभले.
































