
कोरची : एका अल्पवयीन युवतीला व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेमाचा प्रस्ताव देऊन लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार घडला. ती युवती 3 महिन्यांची गर्भवती झाल्याने या प्रकरणाचा भंडाफोड झाला. त्यामुळे अजय टिल्लू कल्लो (25 वर्ष) या युवकावर कोरची पोलिसांनी भा.न्या.सं.च्या कलम 64(2) (एम), 64(2) (आय) सहकलम 4 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील पीडित मुलगी ही 17 वर्ष 6 महिने वयाची आहे. आरोपी युवक हा जांभळी येथील रहिवासी असून तो मजुरीचे काम करतो. आरोपी युवकाची त्या युवतीशी तोंडओळख होती. यातून त्याने 14 फेब्रुवारीला (व्हॅलेंटाईन डे) तिला प्रेमाचा प्रस्ताव दिला. तू मला आवडते, आपण लग्व करू, असे आमिष दाखवत त्याने तिला विश्वासात घेतले. त्यानंतर 14 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत अनेक वेळा तिचे लैंगिक शोषण केले.
पीडित मुलीला गर्भधारणा होऊन 3 महिने झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार लक्षात आला. बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ती 3 महिन्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. वयाची 18 वर्ष पूर्ण व्हायची असल्यामुळे त्या युवकावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.































