देसाईगंज : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वनहक्क मान्यता अधिनियम 2006, नियम 2008, तसेच सुधारित नियम 2012 अंतर्गत ग्रामसभा सावंगी यांना सन 2011 मध्ये 257.68 हेक्टर सामूहिक वनहक्क क्षेत्र प्राप्त झाले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून या सामूहिक वनहक्क क्षेत्राच्या विकासासाठी वन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.
देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती हिरळकर यांच्या उपस्थितीत सदर आराखडा मंजुरीसाठी सादर करण्यात आला. वन व्यवस्थापन आराखडा तसेच अतिरिक्त नियोजन आराखड्यात मंजूर करण्यात आलेली कामे प्रत्यक्ष क्षेत्रात राबविण्यासाठी 30 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार ग्रामसभेला रोहयो अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सामूहिक वनहक्क क्षेत्रात विविध विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
सामूहिक वनहक्क क्षेत्राच्या विकासाबरोबरच गावातील नागरिकांना गावपातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामसभा प्रयत्नशील आहे. सदर उपक्रम वनरक्षक, सृष्टी संस्था आणि एफ.ई.एस. संस्थेच्या सहकार्याने, तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे.
यावेळी ग्रामसभाध्यक्ष सविता जगदीश उईके, सचिव देवचंद मेश्राम, ग्रामसभा मार्गदर्शक कुणाल गुरनुले (सृष्टी संस्था, येरंडी), महाग्रामसभेचे सचिव पत्रे, महाग्रामसभा प्रतिनिधी बाबुनाथ बेद्रे, ग्राम सभा सदस्य त्रिज्या कन्नाके, रविना उईके (कोषाध्यक्ष) मोतीराम उइके, रेखा कन्नाके, वर्षा कन्नाके, शालू उईके, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
































