धानोरा : जंगलातील 19 सागवान आणि 2 बिजा झाडांची अनधिकृतपणे कटाई करून गावालगतच्या शेतात ठेवणाऱ्या तिघांना वनविभागाच्या पथकाने अटक केली. त्यांना 30 मार्चपर्यंत वनकोठडी देण्यात आली. धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) या गावात ही कारवाई झाली.
चिनू रैनू दुगा, कालिदास बिड्डू आतला आणि संतोष देवराव तोफा अशी अटक झालेल्या तिघांची नावे आहेत. मेंढा येथील वनरक्षक एच.के.मडावी आणि क्षेत्र सहायक ए.के. गांगरेड्डीवार हे गस्तीवार असताना मेंढा गावाजवळच्या संतोष तोफा यांच्या शेतात 19 सागवान आणि 2 बिजा प्रजातीची झाडे कापून ठेवल्याचे दिसून आले. ही झाडे परवानगी न घेता अवैधपणे कापल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने चौकशी करून तिघांना ताब्यात घेतले. सामूहिक वनहक्कप्राप्त जंगलातून ही झाडे कापल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यात आणखी कोणत्या आरोपींचा सहभाग आहे का, याची तपासणी केली जात आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक आर्या व्ही.एस., सहायक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनात दक्षिण धानोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी केली.
































