कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील वडेगावच्या क्रांतीवीर नारायणसिंह उईके आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेजवळच्या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर विद्यार्थी शौचासाठी तलावाकडे गेला होता असे सांगितले जाते. त्याच्यासोबत आणखीही काही विद्यार्थी तलावाकडे गेले होते. आश्रमशाळेचे विद्यार्थी पर्यवेक्षकीय यंत्रणेची नजर चुकवून तलावाकडे जाणे हा गंभीर ढिसाळपणा असून यासाठी जबाबदार असणाऱ्यावर आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे पालकवर्गाचे लक्ष लागले आहे.
वेदांत शंकर पदा (रा.नवेझरी) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वेदांत याच्यासह काही विद्यार्थी शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आश्रमशाळेला लागून असलेल्या तलावाकडे गेले होते. वेदांत शोचास गेला असताना तलावाच्या पाण्यात पडला. विद्यार्थ्यांनी आरडाओरड करून शाळेत सांगितल्यानंतर अधीक्षक एच.डी.टेंभुर्णे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेदांतला बाहेर काढून कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. पण डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वास्तविक परवानगीशिवाय आश्रमशाळेच्या आवाराबाहेर विद्यार्थ्यांना जाता येत नाही. असे असताना काही विद्यार्थी बिनधास्तपणे बाहेर जातात. त्यातही तलावासारख्या धोकादायक ठरू शकणार्या जागेकडे जातात, तरीही पर्यवेक्षकीय यंत्रणेला त्याची माहिती नसणे ही बाब गंभीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी मुख्याध्यापक भोयर सकाळची शाळा आटोपून आपल्या घरी गेले होते. मात्र इतर कोणीच जबाबदार व्यक्ती शाळेत नव्हते का? असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर कसे जाऊ दिले? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
































