Home दैनंदिन बातम्या अकरावीच्या विद्यार्थ्यांने शाळेच्या वसतिगृहात घेतला गळफास?

अकरावीच्या विद्यार्थ्यांने शाळेच्या वसतिगृहात घेतला गळफास?

घटनेचे रहस्य उलगडण्याचे आव्हान

गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील शांतीनगरमधील रहिवासी आणि सेमाना बायपास मार्गावरील एकलव्य सरकारी आश्रमशाळेचा विद्यार्थी प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम (17 वर्ष) याचा वसतिगृहातच गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही रहस्यमय घटना आत्महत्या आहे की घातपात, हे स्पष्ट झालेले नाही. (अधिक बातमी खाली वाचा)

प्रिन्स मेश्राम हा अकराव्या वर्गात शिक्षण घेत होता. आश्रम शाळेच्या वसतिगृहातच तो इतर विद्यार्थ्यांसोबत राहात होता. सायंकाळी 6.15 च्या सुमारास तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनीही तिकडे धाव घेऊन घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेहाचे आज शवविच्छेदन केले जाणार आहे.

प्रिन्सची आई ही शिक्षिका असून प्रिन्स हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबासह शांतीनगर गावात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर मृतकाच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही तणावात न दिसणाऱ्या प्रिन्सने असे टोकाचे पाऊल कसे काय उचलले याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या काही वेळाआधीच त्याने शाळेच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात तबला वाजवला होता. त्यावेळीही तो कोणत्याही तणावात दिसत नव्हता. मग काही वेळातच असे काय झाले, याचा तपास करून मृत्यूचे नेमके कारण समोर आणण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे.