
गडचिरोली : शक्तीची देवता आणि रामभक्त म्हणून ज्यांना मोठ्या भक्तीभावाने पुजले जाते त्या हनुमानाचा जन्मोत्सव गुरूवारी गडचिरोली शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गडचिरोलीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सेमाना हनुमान मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. संध्याकाळी हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
अनेक ठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये पहाटेपासून भक्तिगितांचे सुमधूर सूर ऐकायला येत होते. शहरातील तमाम छोट्या-मोठ्या हनुमान मंदिरांमध्ये सकाळी पुजा-अर्चना केल्यानंतर मसालेभात, बुंदी असा प्रसाद वाटल्या जात होता. केवळ मंदिरांसमोरच नाही तर काही चौक आणि प्रतिष्ठानांसमोर मंडप टाकून मसालेभात वाटला जात होता. यातून अन्नदान करण्याची इच्छा अनेकांनी पूर्ण केली. याशिवाय काही मंदिरांमध्ये रात्री महाप्रसादाचे आयोजन केले होते.
सेमाना हनुमान मंदिरात संध्याकाळी आयोजित महाप्रसाद घेण्यासाठी शहरातील नागरिकांची एकच गर्दी केली होती. शहराकडून येणारा चामोर्शी मार्ग, कॅाम्प्लेक्स भागातून येणाऱ्या सेमाना बायपास मार्गावर वाहनचालकांची गर्दी वाढून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गडचिरोली पोलिसांनी वाहने ठेवण्याची व्यवस्था लांब ठेवली होती. त्यामुळे वाहने काढण्यास अडचण निर्माण झाली नाही. रात्री उशिरापर्यंत दर्शन आणि महाप्रसाद सुरू होता.
































