Home राजकीय घडामोडी देसाईगंजमध्ये भाजपच्या कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता

देसाईगंजमध्ये भाजपच्या कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता

नारी शक्तीतून राष्ट्र शक्ती : गजबे

देसाईगंज : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-2026 अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या देसाईगंज (शहर) मंडळातर्फे वन कर्मचारी पतसंस्था सभागृहात आयोजित दोन दिवसीय निवासी कार्यशाळेची शनिवारी सांगता झाली. या शिबिरात सात सत्रांद्वारे कार्यकर्त्यांना भाजपचा इतिहास, संघटना विस्तार, वैचारिक अधिष्ठान, सरकारची कामगिरी, बुथ व्यवस्थापन आणि सोशल मीडिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दिवसभराच्या सत्रांमध्ये प्रथम भाजपचा इतिहास आणि विकासावर जिल्हा कायम निमंत्रित सदस्य राम पडोळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पक्षाच्या संघर्षमय प्रवासावर प्रकाश टाकून कार्यकर्त्यांना एकजुटीने पुढील ध्येय साध्य करण्याचे आवाहन केले. दुसऱ्या सत्रात एस.आय.आर.(SIR) विषयावर जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी विशेष तंत्रे शिकवली, ज्यामुळे कार्यकर्ते मतदार नोंदणी आणि पुनरावलोकनाबाबत सजग झाले.

तिसऱ्या सत्रात संघटन विस्ताराची दृष्टी या विषयावर माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदिवे यांनी मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात वैचारिक अधिष्ठानावर जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांनी पंडित दीनदयालांच्या एकात्म मानववाद तत्त्वज्ञानाची माहिती दिली.

पाचव्या सत्रात ‘आपल्या सरकारची कामगिरी’ या विषयावर माजी आमदार कृष्णा गजबे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांसाठी आत्मसन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणावर भर देऊन सांगितले की, “नारी शक्तीतून राष्ट्र शक्तीची निर्मिती होते. पंतप्रधान उज्वला योजनेने 10.51 कोटी पेक्षा अधिक एलपीजी कनेक्शन वाटप करून महिलांना स्वयंपाकाच्या धुरापासून मुक्त केले. स्टार्टअप इंडियाने 1.97 लाख स्टार्टअप्स नोंदवली, ज्यात 100 युनिकॉर्न आहेत; यामुळे रोजगार वाढला.” यावेळी त्यांनी सरकारने राबविलेले विविध उपक्रम आणि योजनांच्या यशस्वीतेवर सविस्तर माहिती दिली.